तंबाखूचे
सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. तंबाखूमुळे कर्करोग रोग होतो, असं कितीही डोकं फोडून सांगितलं तरी
तंबाखू खाणारा काही तंबाखूचा बार भरायचे सोडत नाही. शेवटी व्यसनच ते. कोणतंही
व्यसन लागताना संगतीने लागतं आणि मग सोडायचं म्हटलं तर काही केल्या सुटत नाही. म्हणूनच
या व्यसनाच्या मॅटरमध्ये कुठे थांबायचे हे ज्याला कळत नाही तो पूर्णपणे उद्ध्वस्त
होतोच, हे अटळ आहे...
तंबाखूसारख्या
राष्ट्रीय समस्येवर एवढी आणि सर्वांना माहित असलेली प्रस्तावना सांगण्याचे कारण
सरळसोट आहे. गेली तीनेक वर्षे मी हार्बर मार्गावर या तंबाखूचा बार भरतात
त्यांच्यापासून त्रस्त आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरही मी अनेक वर्षे
प्रवास केला पण, हार्बरवर बार भरणारी मंडळी संख्येने
जरा जास्तच आहे, या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो आहे.
कदाचित
हार्बर मार्गावर मोलमजुरी करणारा, ड्रायव्हिंग
करणारा, नाका कामगार मोठ्या प्रमाणात
असल्यामुळे असेल पण, आपल्या आरोग्याची ऐशी की तैशी
करणारे हे दुसरा जो व्यसनापासून चार
हात लांब राहणारा आहे त्याच्या आरोग्याशी का खेळतात? त्याच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार ह्यांना कुणी दिला?
घड्याळ
लावून बरोब्बर २० मिनिटांचाच माझा हार्बरवरचा रोजचा प्रवास आहे. एखाद्या दिवसाचा
अपवाद सोडला तर गेल्या तीन वर्षात तंबाखू खाणारी व्यक्ती माझ्या शेजारी किंवा समोर
नाही, असं कधीही घडलेलं नाही. हातात जाडाभरडा
तंबाखू घ्यायचा. ट्युबमधून वा डबीतून चुना काढून तो त्यात मिसळायचा. गप्पा छाटत
तंबाखू रगड रगड रगडायचा आणि बराच वेळ ही रगडारगडी झाल्यानंतर आपण कुठे बसलोत याचं
जराही भान न ठेवता रगडलेल्या तंबाखूवर चापटी मारायची, हा यांचा सहज कार्यक्रम. बरं असं केल्यानं आजूबाजूला
बसलाय त्याला ठसका हमखास लागतोच. पण आपण त्या गावचे नाहीच अशा आविर्भावात ही मंडळी
कानाडोळा करतात.
मी
तंबाखू खात नाही. मला तंबाखूचा वासही सहन होत नाही तर मी हा तंबाखूचा दुर्गंध का म्हणून सहन करू?
कालच
पानाचा विडा तोंडात कोंबलेल्या एका महाशयाने मधल्या माणसाला ओलांडून मी
जेथे खिडकीपाशी बसलो होतो तेथून मुंडकं आडवं करत खिडकीच्या फटीतून पिचकारी मारली.
मी त्याच्याकडे रागाने पाहिले. पण असे राग देऊन ही मडंळी सुधारेल असे मला तरी वाटत
नाही.
शेवटी लोकल असो की अन्य कोणतंही सार्वजनिक ठिकाण...
ही व्यसनाची विषवल्ली काही थांबायची नाही. जेथे मुलगा आणि बाप एकत्र ‘बसून’ दारूचे पेग शेअर करू
लागलेत त्या समाजात सुधारण्याची अपेक्षा तरी कुणाकडून ठेवायची!
कसलं आरोग्य आणि कसलं काय!

No comments:
Post a Comment